आज त्या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस होता.
तो ऑफीसमधून येण्याची ती आतुरतेनं वाट पहात होती.लग्नानंतर काही वर्षात सगळी समीकरणंच बदलून गेली. परस्परांशिवाय क्षणही राहू न शकणा-या त्या दोघांचं क्षुल्लक कारणानंही भांडण होऊ लागलं.
एकामेकांशी तर आता ते फारसं बोलतही नसत...
एकाच छपराखाली राहूनही दोघंजण परस्परांना अनोळखी झाले.
पण मनातून दोघांनाही त्या बदललेल्या वातावरणाबद्दल पश्चाताप होत होता.
आणि म्हणूनच त्या दिवशी ती त्याची आतुरतेनं वाट पहात होती...
त्याला लग्नाचा वाढदिवस तरी लक्षात आहे का याची ती वाट पहात होती.
नेमकं त्याच वेळी दाराची बेल् वाजली.
तिनं धावतच जाऊन दार उघडलं तर बाहेर पावसानं चिंब भिजलेला तो उभा होता...
हातात तिच्याच आवडीची निशिगंधाची फुलं घेऊन...
दोघांनीही मनोमन ठरवलं की आता काही झालं तरी भांडायचं नाही...
एकामेकांना समजून घ्यायचं...
फुलं तिच्या हातात देऊन तो आत गेला. त्यानं आणलेल्या निशिगंधाच्या फुलांचा सुगंध उपभोगताना ती भान हरपून गेली होती.
त्याचवेळी त्याच्या फोनची रिंग वाजल्यानं ती भानावर आली.
पलिकडून आवाज ऐकू आला, "मॅम्, मी पोलिस स्टेशनमधून बोलतोय. हा नंबर --- यांचाच ना?"
धडधडत्यानं हृदयानं तिनं उत्तर दिलं,
"होय... पण का हो...?
" त्यावर पलिकडून उत्तर आलं, "आय ऍम सॉरी मॅम्...
पण एक अपघात घडलाय आणि एक व्यक्ती त्यात मृत्युमुखी पडलेली आहे.
त्या व्यक्तीच्या खिश्यातल्या पाकीटातनं आम्हाला हा नंबर मिळालाय. तुम्ही शवागृहात येऊन डेड्बॉडी ओळखावी यासाठी मी हा फोन केलाय." ते ऐकून तिच्या हातापायांना कंप सुटला... ती म्हणाली, "इन्स्पेक्टर साहेब,
पण माझे पती तर आत्ता इतक्यातच घरी आलेत हो...
" त्यावर पोलिस स्टेशनमधून उत्तर आलं,
"सॉरी मॅम्, आत्ता दुपारी चार वाजता हा अपघात घडलाय. ट्रेनमधे चढताना हा अपघात घडलाय."
ते ऐकून तिला भोवळ आली.
असं कसं काय घडू शकतं?
मृत्युमुखी गेलेल्यांचा आत्मा मृत्युनंतर लगेचच दूरवर असलेल्या प्रिय व्यक्तींना शेवटचं भेटण्यासाठी येऊ शकतो असं तिनं पुस्तकांमधे वाचलेलं होतं.
भरलेल्या डोळ्यांनी ती आत बेडरुमकडे धावली.
पण तो तिथे नव्हताच.
तिच्या मनात विचार येऊ लागले,
'पुस्तकात वाचलेलं खरं आहे का?
तो खरंच गेलाय का?
देवा रे... मी त्याच्याशी ज्या क्षुल्लक कारणांवरुन भांडल्येय त्याबद्दल आता मी क्षमा कशी मागू?'
मोठ्या हुंदक्यानं ती जमिनीवर कोसळली.
त्याचवेळी बाथरुमचं दार उघडल्याचा आवाज तिनं ऐकला. आपले ओले केस पुसत तो बाहेर आला आणि म्हणाला,
"स्विट् हार्ट... तुला सांगायचंच विसरुन गेलो बघ...
आज दुपारी ट्रेनमधे चढत असतानाच कोणीतरी माझं पाकीट मारलं."
ते ऐकून सुटकेच्या निःश्वासानं तिचं हृदय पिळवटून निघालं.
तो खरोखरच जिवंत आहे हे जाणताच तिच्या अश्रूंचा बांध फुटला.
पण प्रत्येकालाच आयुष्य अशी दुसरी संधी देत नसतं.
आणि म्हणूनच वेळ घालवू नका.
घडलेल्या चुकांबद्दल क्षमा मागून मोकळे व्हा.
आई-बाबा,
पती किंवा पत्नी,
भावंडं, नातेवाईक,
मित्र-मैत्रिणी आणि इतरांशी आपल्या चुकीच्या वागण्याचा पश्चाताप होऊ द्या...
अश्यानं आयुष्यात पश्चातापच उरत नाही.